महिला वाहकाचा उद्धटपणा..!विद्यार्थीनीला बसच्या बाहेर काढत निर्जनस्थळी सोडले जंगलात
सचिन धानकुटे
सेलू : – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकाने एका शाळकरी विद्यार्थीनीस भरजंगलात सोडून दिल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. “त्या” विद्यार्थीनी सोबत महिला वाहकाने केलेल्या प्रकाराविषयी जुवाडी येथील सरपंच अरविंद चाफले यांनी संताप व्यक्त करीत वाहतूक नियंत्रकांना यावेळी चांगलेच धारेवर धरले.
स्थानिक विद्याभारती कॉलेजच्या विज्ञान शाखेत जुवाडी येथील एक विद्यार्थीनी शिक्षण घेते. ती दररोज जुवाडी येथून सेलू येथे शिक्षणासाठी ये-जा करते. याकरिता तीच्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा पास देखील आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ती ९९९७ क्रमांकाच्या बसमध्ये जुवाडी येथून बसली. दरम्यान महिला वाहकाने आज पासेस चेक केल्या असता एक तारीख असल्याने अनेकांकडे एप्रिलचा पासच नव्हता, किंबहुना शाळांनी देखील तो पास विद्यार्थ्यांना दिला नाही, कारण काल रविवारी शेवटची तारीख आणि आज एक तारीख होती. याकरिता महिला वाहकाने तिकीट काढण्यासाठी पैसे मागितले, ज्यांच्याकडे होते त्यांनी दिले आणि इतरांनी ओळखीच्या व्यक्तीला मागितले. परंतु यावेळी “त्या” एका विद्यार्थीनीकडे पैसे नसल्याचे ध्यानात येताच आणि तीला यावेळी कोणी मदत देखील केली नाही. त्यामुळे तीला बसच्या खाली उतरण्यासाठी बाध्य करण्यात आले. यावेळी तीने महिला वाहकास विनंती देखील केली की, सेलूत गेल्यानंतर कुणाकडे तरी मागून पैसे देतो. परंतु महिला वाहकाने काहीच ऐकले नाही आणि तीला जुवाडी ते वडगांव दरम्यान भरजंगलात उतरवून दिले. यावेळी जंगलात निर्जनस्थळी उतरवल्याने विद्यार्थीनी देखील चांगलीच भयभीत झाली होती, परंतु त्या महिला वाहकास काही घाम फुटला नाही.
सदर बाब जुवाडी येथील सरपंच अरविंद चाफले यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर विद्यार्थीनीला घेऊन वाहतूक नियंत्रण कक्ष गाठला. यावेळी त्यांनी महिला वाहकाने त्या विद्यार्थीनीस येथपर्यंत आणून पैशाची सोय होत पर्यंत बसवून ठेवायला हवे होते, असे म्हणत संतापाने नियंत्रकांना चांगलेच धारेवर धरले. याआधीही एका विद्यार्थीनीस उशीरा रात्री अशाचप्रकारे बायपासवर निर्जनस्थळी उतरविण्यात आले होते हे विशेष..