स्वच्छ भारत अभियानाचा वर्ध्यात बोजवारा..! शहरातील प्रवेशद्वारावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग
सचिन धानकुटे
वर्धा : – वर्ध्यात आगमन होताच शहरातील प्रवेशद्वारावर नागरिकांना दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा सामना करावा लागत असल्याने शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरालगतच्या दत्तपूर बायपासवर टाकाऊ कचरा फेकला जातोयं. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे तयार झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथे घनकचरा तसेच उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात टाकल्या जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात सर्वदूर दुर्गंधी पसरते. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी जणूकाही डंपिंग ग्राउंडच तयार करण्यात आल्याचा भास होतोयं. डोडानी चौकापासून तर इव्हेंट सभागृहापर्यंत अशीच काहीशी परिस्थिती आहे. पवनार, सेलू आणि नागपूरकडे जाणाऱ्यांसह लगतच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा दररोज सामना करावा लागतो.
शासनाकडून मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलायं. परंतु स्थानिक नगरपालिका प्रशासनाला मात्र स्वच्छ भारत अभियानाचा विसर पडला की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.