शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २ कोटी ५९ लाखांचा गंडा..! वर्ध्यातील डॉक्टर दाम्पत्यासह टाकळीच्या सावरकर बंधूचा प्रताप
सचिन धानकुटे
वर्धा : – सुशिक्षित गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २ कोटी ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी शहरातील एका महिला डॉक्टरला नागपुरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच गजाआड केले. प्रिती निलेश राऊत असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टर महिलेचे नाव असून शहरातील कारला चौकात त्यांचा दातांचा दवाखाना आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पवार करीत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेलू तालुक्यातील टाकळीचा रहिवासी असलेल्या सुरज मधुकर सावरकर नामक भामट्याने आय एक्स ग्लोबल नावाच्या कंपनीत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर मार्केट, क्रिप्टो मार्केटचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले होते. यामध्ये अनेकांना ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास ५ ते १५ टक्के नफा कमाविण्याचे आमिष दाखविले. सुरजने याकरिता पी आर ट्रेडर्स, एम आर ट्रेडर्स, आर के ट्रेडर्स, ग्रीन व्हॅली ऍग्रो, टी एम ट्रेडर्स अशा विविध प्रकारच्या कंपनीचे कोलकाता येथील कॅनरा बँकेच्या शाखेचे वेगवेगळे अकाऊंट नंबर दिलेत. त्यात टी पी ग्लोबल आणि एफ एक्स नामक ब्रोकर वेबसाईटवर पैशाची गुंतवणूक करण्यासाठी सांगितले. त्यानुसार अनेक सुशिक्षित अडाण्यांनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यात सेलू तालुक्यातील अनेकांचा समावेश आहे. याआधीही टाकळीच्या सावरकर कंपनीला आयपीएल सट्टा प्रकरणात अटक झाली होती. त्यानुसार कमी वेळात अधिक पैशाचा मोह अनेकांना आवरता आला नाही आणि त्यांनी भामट्या सुरजच्या नादी लागून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यात नागपूर शहरातील विक्रम बजाज या व्यापाराने देखील गुंतवणूक केली. मुदतीनंतर त्यांनी आणि अन्य गुंतवणूकदारांनी परताव्यासाठी टी पी ग्लोबल फॉरेक्स ब्रोकर वेबसाईटवर मागणी केली, परंतु अद्याप त्यांना साधी दमडी देखील मिळाली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बजाज यांनी याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात ता.२४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी यानुसार भादंवि कलम ४२०, ४०६, १२०(ब), ४१८, ३४ नुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६(डी) आणि एमपीआयडीचे सहकलम ३ नुसार एकूण अकरा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात सेलू तालुक्यातील टाकळीच्या सुरज मधुकर सावरकर व सुरेंद्र मधुकर सावरकर यांच्यासह वर्ध्याच्या कारला चौकातील डॉक्टर दाम्पत्य डॉ निलेश राऊत आणि डॉ प्रिती राऊत, दहिसर मुंबईचा विराज सुहास पाटील, पंजाबच्या जालंधर येथील प्रियंका खन्ना, पी आर ट्रेडर्सचा प्रिंसकुमार, एम आर ट्रेडर्सचा राकेश कुमार सिंग, टि एम ट्रेडर्सचा अमन ठाकूर, आर के ट्रेडर्सचा राहुल कुमार अकेला, मिलन एन्टरप्रायजेस ठाणे आणि पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील ग्रीन व्हॅली ऍग्रो कंपनी अशा अकरा आरोपींचा समावेश आहे. यातील डॉ प्रिती निलेश राऊत यांना नुकतीच अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणात २ कोटी ५९ लाख ६४ हजार ६४५ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अधिक तपास नागपुरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पवार करीत आहेत.