Breaking
ब्रेकिंग

अखेर महाठग शरद कांबळेसह व्यवस्थापक गजाआड..! सात दिवसांची पोलीस कोठडी, बँकेच्या संचालकांवर अटकेची टांगती तलवार

2 2 5 3 7 1

सचिन धानकुटे

सेलू (ता.२9) : – शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू केलेल्या बँकेच्या माध्यमातून महाठग शरद कांबळे यांनी हजारो खातेदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात सेलू पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीहून महाठग शरद कांबळे सह संचालकांवर विविध प्रकारच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महाठग शरद कांबळे सह व्यवस्थापकीय संचालकास अटक करण्यात आली. याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आलेल्या दोघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात इतर संचालकांवर देखील अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे.

      महाठग शरद कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतकरी महिला निधी लिमिटेड नामक बँक सुरू केली. सदर बँकेच्या एकूण नऊ शाखा आहेत. यामध्ये जवळपास सात हजार खातेदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून एकाही खातेदारास बँकेच्या शाखांतून साधी दमडीही मिळाली नाही. दरम्यानच्या काळात महाठग शरद कांबळे यांनी खातेदारांना तारीख पे तारीख दिली आणि शेवटी खातेदारांच्या संयमाचा बांध फुटला. खातेदारांनी वंडरलॅड वॉटरपार्क‌‌‌मध्ये तोडफोड करीत शरद कांबळे सह त्याचा भाऊ रोशन कांबळे या दोघांनाही त्यांच्याच घरात लाथाबुक्क्यांनी तुडवले. खातेदारांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि शरद कांबळे ह्यास शेवटचा अल्टीमेटम दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले.

      याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात एका खातेदाराने नुकतीच तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शरद कांबळे, प्रियंका कांबळे, रोशन कांबळे, प्रशांत फुलझेले, व्यवस्थापकीय संचालकासह इतर संचालक मंडळावर भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाठग शरद कांबळे सह व्यवस्थापकीय संचालकास अटक केली असून दोघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात इतर संचालकांना देखील अटक होण्याची शक्यता असून पुढे काय होणार याकडे फसवणूक झालेल्या खातेदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे अधिक तपास करीत आहे.

 

खातेदारांनी गुंतवणूकीचे पुरावे सादर करावे – कांचन पांडे

   शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या विविध शाखांमध्ये ज्या खातेदारांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी तत्काळ आपल्या पैशाची गुंतवणूक केल्याचे पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी केले आहे. महाठग शरद कांबळे यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलावातून खातेदारांना पैसे परतफेड करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या अहवालासाठी असं करणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे