वर्ध्यातील हरहुन्नरी छायाचित्रकार चंदू नेवरे काळाच्या पडद्याआड
वर्धा : – येथील हरहुन्नरी छायाचित्रकार चंदू उर्फ विलास तुकारामजी नेवरे यांनी सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान काल रात्री अखेरचा श्वास घेतला. वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली..
चंदू उर्फ विलासकाका नेवरे यांना चार दिवसांआधी हॄदयविकाराचा धक्का बसल्याने सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी काल शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आपल्या फोटोग्राफीमुळे त्यांनी वॄत्तपत्रसॄष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शरीरयष्टी साथ देत नसतानाही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची फोटो काढण्यासाठीची धडपड आणि कला वाखाणण्याजोगी होती. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. दैनिक भास्कर या वॄत्तपत्रात त्यांनी अनेक वर्षे छायाचित्रकार म्हणून काम केले आहे. वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनाने वॄत्तपत्रसॄष्टीसह कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या मागे मुलगा सारंग व सुमित असा आप्तपरिवार आहे. वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.