खेळता खेळता शौचालयाच्या टाक्यात पडला सात वर्षीय चिमुकला..! पाण्यात बुडाल्याने मृत्यू
सचिन धानकुटे
सेलू : – शौचालयाच्या टाक्यात सात वर्षीय मुलगा खेळता खेळता पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विखणी येथे घडली. अनुज गणेश मडावी (वय७) रा. विखणी, ता. समुद्रपूर असे मॄतक बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विखणी येथे गजानन झाडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी शौचालयाच्या टाक्याची निर्मिती करण्यात आली. त्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण नसल्याने मॄतक अनुज खेळता खेळता त्यात पडला. ही घटना शुक्रवार ता.९ रोजी दुपारी चार वाजता पासून ते शनिवार ता.१० रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. यादरम्यान बेपत्ता अनुजची सगळीकडे शोधाशोध सुरू होती. यावेळी शनिवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान गावातील यश नामक मुलाने अनुजच्या काकांना सांगितले की, अनुज हा झाडे यांच्या निर्माणाधीन घराच्या जवळ शुक्रवारी खेळताना दिसला होता. त्यानुसार सगळ्यांनी त्याठिकाणी पाहणी केली असता अनुज शौचालयाच्या टाक्यात पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकाने तत्काळ त्या टाक्यात उतरत अनुजचा मृतदेह बाहेर काढला. अनुज हा इयत्ता दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.