चार महिन्यांपासून सेलूतील आधार सेवा केंद्र कुलूपबंद
सचिन धानकुटे
सेलू : – शहरातील आधार सेवा केंद्र गेल्या चार महिन्यांपासून कुलूपबंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आधार केंद्राच्या टाळ्याला पाहून आल्यापावली परत जावे लागते. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
शासकीय कामासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच नागरिकांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशात आधार कार्ड अपडेट करायचं म्हटलं तर तालुक्यातील एकही आधार सेवा केंद्र सुरू नाहीत. त्यामुळे नागरिकांना वर्ध्याशिवाय पर्याय नाही.
येथील तहसील कार्यालय परिसरात असलेले आधार सेवा केंद्र गेल्या चार महिन्यांपासून कुलूपबंद आहे. ते मागील आठवड्यात सुरू झालं होत खरं, परंतु पुन्हा काही कारणास्तव बंदच आहे. सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली येथील आधार सेवा केंद्र बंद असल्याचे सांगितले जाते. याकडे संबंधितांनी तत्काळ लक्ष देवून पुन्हा आधार सेवा केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.