बुरशीजन्य भाजी अन् पुऱ्यांना उग्र वास..! पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन
सचिन धानकुटे
वर्धा : – वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. त्याप्रमाणे तो कार्यक्रम यशस्वी देखील झाला. परंतु कार्यक्रम संपताच लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या भोजनामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.
तीसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झालेल्या नरेंद्र मोदी यांचा आज वर्ध्यात कार्यक्रम होता. पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाइल पार्कच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शहरात आले होते. प्रशासनाकडून देखील कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना गावातून कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. आदल्या दिवशी रात्रीच प्रत्येक गावात बसेस दाखल झाल्या होत्या. त्यात बसूनच लाभार्थी कार्यक्रमस्थळी पोहचलेत. जाताना त्यांना नाश्ता आणि चहा सुद्धा देण्यात आला. तसेच कार्यक्रम आटोपल्यानंतर पॅकींग केलेलं जेवण देण्यात आले.
लाभार्थ्यांनी जेव्हा खाण्यासाठी जेवण उघडले, तेव्हा मात्र त्या जेवणाला एक वेगळाच दर्प येत होता. पुऱ्यांना कुबट वास येत होता तर भाजीला बुरशी लागल्याचे लाभार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे लाभार्थ्यांनी ते निकृष्ट दर्जाचे भोजन फेकून देण्यातच धन्यता मानली. सेलू येथील पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी कालचं लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनांविषयी बोलताना आपल्या अकलेचे तारे तोडले होते. नाश्ता आणि जेवण अगदी दर्जेदार असून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतरच लाभार्थ्यांना ते देण्यात येणार असल्याची माहिती छातीठोकपणे सांगितली होती.
परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा तो दावा फोल ठरला. त्यामुळे बुरशीजन्य भाजी आणि कुबट वासाच्या पुऱ्यांना प्रमाणित करणारा अन्न व औषध प्रशासनाचा तो “बयताड” अधिकारी नेमका कोण..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. यासोबतच याकडे देखरेख ठेवण्यासाठी ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या गटविकास अधिकारी यांनी हे सगळं होत असताना झोपेचं सोंग घेतले होते काय असा संतप्त सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचे भोजनही दर्जाहीन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना तर निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आलेचं, याशिवाय रस्त्यावर भर उन्हातान्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील देण्यात आलेलं भोजन दर्जाहीन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.