Breaking
ब्रेकिंग

कारवाईच्या नावाखाली भोजनासाठी थांबलेल्या वाहनधारकांकडून केली अवैध वसूली : प्रादेशिक परिवहन विभागाच्या हफ्तावसुलीची पंचक्रोशीत चर्चा, आरटीओच्या अधिकाऱ्यांचा ढाब्याच्या पडद्याआड खेला..!

2 4 7 1 8 4

सचिन धानकुटे

सेलू : – प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या अवैध वसूलीसाठी नेहमीच चर्चेत असतात. असाच काहीसा प्रकार आज शनिवारी रमणा फाट्याजवळ दुपारी चार वाजताच्या सुमारास घडला. येथील एका ढाब्यावर भोजनासाठी थांबलेल्या वाहनधारकांना कारवाईच्या नावाखाली बोलावून त्यांच्याकडून अवैध वसुली करण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या त्या वाहनात केवळ आणि केवळ एक जण वाहनचालकाच्या जागेवर बसून अवैध वसूलीत मग्न होता. त्यामुळे सदर अवैध वसूली कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, याविषयी परिसरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

     वर्धा ते सेलू मार्गावर असलेल्या रमणा फाट्याजवळ एक ढाबा आहे. त्याठिकाणी लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांनी भोजनासाठी आपली वाहनं उभी केली होती. दरम्यान अचानक दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाचे एक शासकीय वाहन अवतरले. त्या शासकीय वाहनाचा क्रमांक एम एच ०४ केआर ६४३२ असा होता. त्यातील एका महाभागाने त्या उभ्या असलेल्या ट्रक चालकांना कारवाईच्या नावाखाली कागदपत्रे घेऊन येण्याचा आदेश दिला. वाहनचालकाच्या आसनावर विराजमान असलेल्या एका महाभागाने थातूरमातूर कागदपत्रे तपासली आणि आपला खिसा गरम करीत तेथून काढता पाय घेतला. दरम्यान त्याठिकाणी उपस्थित एका दक्ष नागरिकाने वरील सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे, हे विशेष..! 

     यात मजेशीर बाब म्हणजे आज शनिवार असल्याने सहसा शासकीय कार्यालये कुलूपबंद असतात. परंतु अवैध वसूलीसाठी काही महाभाग अशाच दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. आरटीओची जी गाडी आज अवैध वसूलीसाठी वापरण्यात आली, त्यात केवळ एकच जण कसा, असा प्रश्न यावेळी साहजिकच अनेकांना पडला. त्यामुळे आरटीओची ही अवैध वसूली नेमकी कोणाच्या आशिर्वादाने सुरू होती, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे