नागा साधूच्या वेशात दरोडेखोर..! हुसनापूर टोल प्लाझावर पाच भामटे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – नागा साधूच्या वेशात वाटमारी करणाऱ्या पाच भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने हुसनापूर टोल प्लाझावर गजाआड केले. त्यांच्याकडून एका चारचाकी वाहनासह पाच मोबाईल व रोख रक्कम असा ८ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हिंगणघाट तालुक्यातील आजनगांवच्या साहेबराव झोटिंग यांनी शनिवार ता.३ रोजी किरण वादाफळे यांच्याकडून ५० हजार रुपये घेऊन आपल्या गावी निघाले. दरम्यान मुलांसह मोटारसायकलने गावांकडे जाताना त्यांना वणा नदीच्या पुलावर नागा साधूच्या वेशातील दरोडेखोरांनी रोखले, साधू महाराज असल्याने त्यांना दर्शनाचा मोह आवरला नाही. दर्शन घेत असतानाच साधूच्या वेशातील भामट्यांनी त्यांच्या खिशातील ५० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रारीहून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील सुरू होता. सदर गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा व कोणत्याही प्रकारचा पूरावा नसल्याने पोलिसांसाठी आव्हानात्मक असाच होता.
परंतु त्यांनी आपलं तपास कौशल्य वापरून साधूच्या वेशातील भामट्यांचा अखेर शोध घेतला.
पोलिसांना सदर भामटे दारव्हा आणि नेर परिसरात फिरत असल्याचे कळले. दरम्यान त्यांचं जीजे ०१ आर एक्स ०७४५ क्रमांकाचे एर्टिगा वाहन यवतमाळ ते वर्ध्याच्या दिशेने येत असल्याची भनक पोलिसांना लागली. त्यांनी हुसनापूर टोल प्लाझावर नाकेबंदी केली आणि भामटे अलगद जाळ्यात अडकले. यावेळी पोलिसांनी करणनाथ सुरुमनाथ मदारी (वय२२), कैलासनाथ सुरेशनाथ मदारी (वय२७) दोन्ही रा. सरोस्वनी, ता. मेमदावाज, जिल्हा खेडा (गुजरात), गणेशनाथ बाबूनाथ मदारी (वय१८) रा. कोठीपूरा ता. मेमदावाज, प्रतापनाथ रघुनाथ मदारी (वय२८) रा. हलदरावास ता. मेमदावाज आणि धिरुनाथ सरकारनाथ मदारी (वय२६) रा. कपडवंच जिल्हा खेडा, गुजरात अशा साधूच्या वेशातील पाचही भामट्यांना गजाआड केले. त्यांच्याकडून एर्टिगा वाहन, पाच मोबाईल, ५० हजारांची रोकड असा ८ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या पाचही भामट्यांना सध्या हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, अक्षय राऊत, प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, अमोल तिजारे, विजय काळे आदी कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास हिंगणघाट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा करीत आहे.