धक्कादायक.. मृतदेहाचा बैलगाडीतून अखेरचा प्रवास..! ; गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ओढावला प्रसंग
सचिन धानकुटे
वर्धा : – आधुनिक काळातही मृतदेहाला आपला अखेरचा प्रवास चक्क बैलगाडीतून करावा लागल्याची धक्कादायक घटना आज हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैराटी पारधी बेड्यावर घडली. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
खैराटी येथे जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ताचं नसल्याने तेथील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात मोठी तारेवरची कसरत करावी लागते. काल रात्रीच्या सुमारास येथील विनोद भोसले नामक इसमाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रस्त्याअभावी रुग्णालयात दाखल करता आले नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. आज मृतक विनोद भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर रुग्णवाहिकेने कसाबसा गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आला. मात्र त्यानंतर सदर मृतदेहाला आपला पुढील प्रवास चक्क बैलगाडीतून करावा लागला. यानिमित्ताने आधुनिक भारतातील ग्रामीण भागात आजही पक्के रस्ते नसल्याची शोकांतिका एकप्रकारे अधोरेखित झाली. आतातरी सदर बेड्यावरील रस्ता शासनाने त्वरीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.