सूरगांवच्या अभिनव धुलीवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञाला २६ वर्षाची परंपरा ; तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या सूरगांव येथील अभिनव धुलीवंदनासह संतविचार ज्ञानयज्ञाची परंपरा गेल्या २६ वर्षांपासून कायम असून याप्रसंगी यंदाही तीन दिवस विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक गुरुदेव सेवा मंडळासह समस्त ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनव धुलीवंदनासह संतविचार ज्ञानयज्ञाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्यापासून सुरू होणारा हा सोहळा तीन दिवस आयोजित करण्यात आला असून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रविवार ता. ५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, नायब तहसीलदार किशोर शेंडे, मंडळ अधिकारी रमेशराव भोले, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे यांच्या उपस्थितीत सदर सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना, शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन, भजन तसेच प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार ता. ६ रोजी ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, नामधून, योगासन, शेतकरी मेळावा, सामान्य ज्ञान परिक्षा, बाल मेळावा, सर्वधर्म समन्वय संम्मेलन, सामुदायिक प्रार्थना व विष्णू ब्राह्मणवाडे यांचे व्यसनमुक्ती व राष्ट्रीय एकात्मतेवर तर भाऊसाहेब थुटे यांचे सप्त खंजरी किर्तन प्रबोधन होणार आहे. मंगळवार ता. ७ रोजी पहाटे ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, सकाळी सहा वाजता धुलीवंदन संदेश व प्रभातफेरी, त्यानंतर सत्संग पर्वा अंतर्गत कार्यकर्ता सत्कार, दान वाटप, प्रबोधन व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब थुटे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे तर समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, नितेश कराळे, मोहन गुजरकर, मुरलीधर बेलखोडे, अनिल नरेडी, शंकरराव मोहोड, सुनिल बुरांडे, भास्कर वाळके, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, किशोर करंदे, संजय इंगळे तिगांवकर, अवचित सयाम, आशिष गोस्वामी यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सेलू येथील युगावतार मेहेरबाबा भजन मंडळाचे भजन संमेलन, दुपारी तीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी पाच वाजता सामुदायिक प्रार्थना व तदनंतर सायंकाळी सहा वाजता सप्तखंजरी वादक प्रविण महाराज देशमुख यांच्या समारोपीय कार्यक्रमाने अभिनव धुलीवंदन सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.