विश्रामगृहालाच लाचखोरीचा अड्डा बनविणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या घरात सापडली तब्बल ११.९९ लाखांची रोकड : लाचखोर अधिकाऱ्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी : मालमत्तेचीही होणार चौकशी

सचिन धानकुटे
वर्धा : – विश्रामगृहालाच लाचखोरीचा अड्डा बनविणाऱ्या उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या रामटेक येथील निवासस्थानी तब्बल ११ लाख ९९ हजारांची रोकड सापडली असून त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी होणार असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली.
वर्ध्यातील उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी सुरुवातीपासूनच स्वस्त धान्य दुकानदारांना पैशासाठी वेठीस धरले होते. स्वस्त धान्य दुकानदारांकडून कमिशन काढण्यासाठी महिन्याकाठी मंत्र्यांच्या नावाखाली मोठी रक्कम उकळली जात होती. त्यांच्या याच जाचाला कंटाळून अखेर स्वस्त धान्य दुकानदाराकडून २० हजारांची लाच घेताना त्यांच्यासह येळाकेळी येथील स्वस्त धान्य दुकानदाराला गुरुवारी रात्री विश्रामगृहात अटक करण्यात आली. यावेळी तीथे वेगवेगळ्या लिफाफ्यात ५ लाख ६० हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम आढळली होती. याप्रकरणी लाचखोर विजय सहारे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी त्यांच्या रामटेक येथील निवासस्थानाची झाडाझडती घेतली असता तीथे तब्बल ११ लाख ९९ हजार रुपयांची रोकड आढळून आल्याने तपासी अधिकारी देखील चक्रावलेत. लाचखोर विजय सहारे यांनी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया गोळा केल्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदारांकडून वर्तवली जात आहे. सध्या त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांच्या संपूर्ण मालमत्तेची देखील चौकशी होणार असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.