चोराला पकडून नागरिकांचा बेदम चोप ; दिवसाढवळ्याच होता चोरीच्या प्रयत्नात
सचिन धानकुटे
सेलू : – भरदिवसा चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा पाठलाग करीत पकडून नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना आज दुपारच्या सुमारास शहरातील वडगांव रस्त्यावर घडली. यावेळी तीन चोरट्यांपैकी एक नागरिकांच्या हाती गवसला असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहरातील वडगांव रस्त्यावर सोनटक्के यांचे घर आहे. ते दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरातील आतील तसेच बाहेरील दाराला कुलूपबंद करीत घराबाहेर पडले होते. दरम्यान आपले काम आटोपून ते घरी परत आले असता, दोन चोरटे त्यांच्या घराच्या आतील दाराजवळ असल्याचे त्यांना दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरडा करीत मदतीसाठी नागरिकांना बोलावले. दरम्यान घराच्या परिसरात आत असलेल्या दोन्ही चोरट्यांनी कंपाऊंड वॉल ओलांडून धूम ठोकली. यावेळी “त्या” चोरट्यांसाठी देखरेख करणाऱ्या एका चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करीत संताजी सभागृहासमोरील ले-आऊटमध्ये पकडले आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याचे हात बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
गेल्या दोन तासांपासून तो चोरटा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांची देखील दिशाभूल करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर चोरट्याने पोलिसांना आपले खोटे नाव सांगितले असून तो बाहेर जिल्ह्यातील असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. याप्रकरणी सेलू पोलीस अधिक तपास करीत आहे.