बैलगाडीला कारची धडक, विचीत्र अपघातात आठ जण जखमी, अपघातग्रस्त कार सीसीटीव्हीत कैद
सचिन धानकुटे
सेलू : – मजूर घेऊन जाणाऱ्या बैलगाडीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या विचीत्र अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास वडगांव रस्त्यावरील खरडा कारखान्याजवळ घडली. यातील जखमींना सेलूच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघातानंतर पसार झालेली भरधाव कार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील नऊ महिला मजूर आज गुरुवारी पंकज कामडी यांच्या शेतात शेतमजूरीसाठी गेल्या होत्या. कामडी हे दररोज त्या मजूरांना आपल्या चारचाकी वाहनाने ने-आण करीत होते. परंतु आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी नऊही महिला मजूर बैलगाडीतून घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. धनराज आदमने हे त्या नऊही महिलांना बैलगाडीत बसवून घराच्या दिशेने निघालेत. दरम्यान वडगांव रस्त्यावर असलेल्या खरडा कारखान्याजवळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या बैलगाडीला भरधाव मारुती ८०० या कारने मागाहून जोरात धडक दिली. त्यामुळे बैलगाडीचे दोन्ही बैल जमिनीवर लोळलेत तर बसून असलेले सगळे मजूर रस्त्यावर आडवे-तिडवे पडलेत. यात कुणाच्या हाताला, पायाला, कमरेला इजा झाली तर काहींना गंभीर इजा देखील झाली. या विचीत्र अपघातानंतर सगळ्या जखमींना तातडीने देवतारे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर काहींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात धनराज आदमने, बेबी तडस, देवका निमजे, मंदा करनाके, रुखमा पानकावसे, आशा पेटकर, शंकुतला देवळीकर, लता बारापात्रे आदि मजूरांचा जखमींत समावेश आहे. सदर अपघातानंतर अपघातास कारण ठरलेली भरधाव कार घटनास्थळावरून तत्काळ पसार झाली होती. परंतु ती पसार झालेली कार त्या रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून जखमींचे नातेवाईक तीचा कसून शोध घेत आहेत.