म्हातारीचे सोन्याचे दागिने घेऊन भामटे पसार ; क्षीरसमुद्रपूर येथील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – दोन भामट्यांनी सत्तर वर्षीय म्हातारीला प्रलोभन देत तीची फसवणूक केल्याची घटना तालुक्यातील क्षीरसमुद्रपूर येथे गुरुवारी भरदिवसा घडली. याप्रकरणी तक्रारीहून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
क्षीरसमुद्रपूर येथील सत्तर वर्षीय म्हातारी काल दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात बसली होती. दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास दोन भामटे त्यांच्याजवळ आले आणि “बसल्या का आज्जीबाई” अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी आज्जी तुम्हाला ५० लाख रुपये लागले आहेत आणि त्याकरिता दहा हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. म्हातारीने माझ्याकडे पैसेचं नसल्याचे सांगितले. परंतु दोन्ही भामट्यांनी सोने तर असेल ना..! असे म्हणताच म्हातारीने आपल्या घरातून तीन ग्रँमची गळसुळी आणि दिड ग्रँमच्या सोन्याच्या बिऱ्या असा १३५०० रुपयांचा मुद्देमाल काढून भामट्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्यांनी म्हातारीची एका कोऱ्या कागदावर सही घेतली आणि आम्ही तुम्हाला सेलू येथे नेण्यासाठी लगेच येतो, असे म्हणून तेथून पसार झाले. परंतु बऱ्याच अवधीनंतरही ते परत न आल्याने फसवणूक झाल्याचे म्हातारीच्या लक्षात आले. याप्रकरणी तक्रारीहून पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहे.