वर्ध्यात तीन युवकांकडून मध्यरात्री वाहनाची तोडफोड : हिंदनगर परिसरात दहशत ; रामनगर पोलिसांची मध्यरात्री पाहणी
किशोर कारंजेकर
वर्धा : शहरातील हिंदनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तीन युवकांनी जवळपास दहा वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत हिंदनगर परिसरात राहणाऱ्या तीन युवकांनी रात्रीला घरासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून त्यात तीन युवक दिसत आहेत. त्यांच्या हातात टॉमी, लाठी दिसून येत आहे. या युवकांनी एका घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला फोडला असल्याचे प्रथमदर्शनी सांगत आहे. या परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी हा प्रकार युवकांकडून केला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाच्या समोरील व मागील बाजूचे काचा फोडण्यात आल्या.
रात्रीच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. अद्यापही या प्रकरणाची नोंद झाली नसली तरी या गावगुंड युवकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. ज्या युवकांनी हा प्रकार केला ते याच परीसरातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. मध्यरात्री फोडण्यात आलेल्या वाहनाच मोठं नुकसान झाले आहे. वाहनमालकांना आर्थिक फटका बसला आहे.