सेलू तालुक्यातील आयपीएल जुगारावर धाडसत्र ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची “सुनिल”वर कारवाई
सचिन धानकुटे
सेलू : – मोबाईलच्या माध्यमातून आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर हारजितचा जुगार खेळणाऱ्या एकास काल रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तालुक्यातील टाकळी (झडशी) येथे केली. याप्रकरणी सुनिल मधुकरराव सावरकर (वय३७) रा. टाकळी ह्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान टाकळी येथील सावरकर यांच्याकडे धाड टाकली. यावेळी सुनिल सावरकर हा आपल्या घरासमोर असलेल्या बसस्थानकात बसून आयपीएलच्या चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यांवर मोबाईलच्या माध्यमातून हारजितचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत त्याच्याकडून दोन महागडे मोबाईल व अंगझडतीत रोख रक्कम असा एकूण ९२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुनिल सावरकर ह्याच्यावर सेलू पोलिसांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.