विहिरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या : बोर नदीपात्रात आढळला इसमाचा मृतदेह

सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या रेहकी येथील तरुणाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी घडली. प्रविण रामाजी चाफले(वय३५) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक प्रविण हा गेल्या चार दिवसांपासून मानसिक तणावात होता. अशातच त्याने आज मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रकाशराव शिंदे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात माहिती मिळताच सेलू पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
सेलू : – येथील बोर नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह आज दुपारी तरंगताना आढळून आला. अशोक पुंडलिक खरडे(वय५०) रा. जोशीनगर, सेलू असे मृतक इसमाचे नाव आहे.
येथील बोर नदीच्या पात्रात आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी संजय पारसे यांच्या मदतीने मृतदेह नदीच्या पात्राबाहेर काढला. तेव्हा तो जोशीनगर येथील अशोक खरडे असल्याचे उपस्थित नागरिकांनी ओळखले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.