वर्ध्यात पुन्हा दोन पिस्तुल, एक काडतूस केले जप्त : सराईत गुन्हेगार रितिक तोडसाम अटकेत : स्टेशनफैल परिसरात झालेल्या गोळीबारातील आरोपी
किशोर कारंजेकर
वर्धा : वर्ध्यातील इतवारा परिसरात राहणारा तसेच स्टेशनफैल परिसरात गुुन्हेगारांच्या दोन टोळ्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील फरार आरोपी रितिक गणेश तोडसाम याला पोलिसांनी शहरातील विसावा चौकात सापळा लावून अटक केली. त्याच्याजवळून देशी बनावटीचे दोन पिस्तुल तसेच एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
आज पोलिसांना रितिक तोडसाम हा पुन्हा इतवारा परिसरात आला असल्याची तसेच तो पुन्हा त्याच्या इतवारा परिसरातच राहात असलेल्या साथिदारांसोबत गुन्हा करण्याच्या
तयारीनेच इतवारा परिसरात येणार असल्याची माहिती खबर्यांकडून मिळाली होती. त्याचवेळी तो शस्त्र बाळगून असल्याचेही पोलिसांना कळले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यास सापळा लावला. त्याला विसावा चौकात ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे दोन मॅगझिनसह पिस्तुल, ९ एमएमचे जिवंत काडतूस, ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळाला. त्याच्याजवळील सुमारे ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक आर. बी. खोत, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, पवन पन्नासे आदींनी केली.
स्टेशनफैल परिसरात गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या फायरिंगच्या घटनेपासून रितिक तोडसाम हा फरार होता. त्याच्या शोधात पोलिस होते. पोलिसांकडून त्याचा माग काढला जात होता. अशातच तो वर्ध्यातील इतवारा परिसरात आला असून पुन्हा टोळीची जमवाजमव करीत गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर त्याला पोलिसांना वैकुंठधाम मार्गावरील विसावा चौकातून ताब्यात घेतले.