बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजनडबे पुरवठ्यात गौडबंगाल : देवळीच्या इसापुरात जेवण तयार करण्याचे केंद्र : कंत्राटदार पगारिया लाटतात दर महिन्याला लाखोंचा मलिदा
किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनेत मध्यान्ह भोजन डबे पुरविले जाते. याचे कंत्राट दिले गेले असून त्याद्वारे बांधकाम कामगारांना सकस जेवण त्यांच्या कामाच्या स्थळीच पुरविले जावे, अशी ही बांधकाम कामगारांच्या हिताकरीता शासनाने सुरू केलेली योजना असताना या योजनेला संगनमताने कुरण बनविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पगारिया नामक कंत्राटदार सध्या या योजनेचा गैरवापर करून कामगारांच्या टाळूवरील लोणी चाटत आहेत. किती कामगारांना जेवणाचे प्रत्यक्ष डबे पुरविले जातात, त्याचा खरोखरच कामगारांना लाभ मिळत आहे काय, यावर कोणाचेही लक्ष नाही. याबाबत RNN तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे.
कमी डबे तयार करून जास्तीत जास्त कामगारांना जेवणाचे डबे पुरविल्याचे देयक बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयात सादर करणे, ते देयक मंजूर करून घेणे, असा सारा हा गौडबंगालाचा प्रकार आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून या योजनेला कुरण बनविणार्या पगारिया विरुद्ध कारवाई करावी, कामगारांना त्यांच्या हक्काचे सकस जेवण मि़ळावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे. वर्ध्याच्या सोशालिस्ट चौकात बांधकाम कामगार जमतात. त्यातील कित्येकांना या योजनेचा थांगपत्ताही नाही.
बांधकाम अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना दररोज जेवणाचे सरासरी २२०० डबे पुरविले जातात. तर याचा पुरवठादार दरमहा सरासरी २२ हजार डबे पुरविले जात असल्याचे सांगतो. या माहितीतील तफावत संशय निर्माण करणारी असून याबाबत अचूक माहिती देण्याचे टाळले जाते. नोंदीत तसेच अनोंदीत बांधकाम कामगारांना डबे पुरविल्याची नोंद केली जाते, असे बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे
या बांधकाम कामगारांकरीताचे जेवण देवळीजवळील इसापूर येथे तयार केले जाते. हे जेवण कामगारांना जिल्ह्यात पोहोचवायला किती वेळ लागत असेल, त्या जेवणाची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. योजनेला कुरण बनविण्याच्या नादात या जेवणाच्या डब्यात कोण बकासूर शिरला, या योजनेचा मलिदा कोणी लाटतो काय, या चौकशीतून स्पष्ट होणार्या बाबी आहेत. पण यातील काही माहिती मन विषण्ण करणारीच आहे. देयक मात्र ५४ रुपये दराने बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयात संबंधित पुरवठादाराच्या नावाने सादर केले जाते. कोण्या जस्ट किचनचा या जेवण डबे पुरवठ्यासोबत संबंध असल्याचे बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयातून सांगितले गेले.
बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयातील एका कारकुनाकडे याबाबतच्या देयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
डबे पुरविण्याकरीता कंत्राटदाने नागपूरच्या पगारिया नामक एका सब कंत्राटदाराची नियुक्ती केली असल्याचीही माहिती समोर येत आहे. यावर बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयातील कोणाचीच देखरेख नसल्याने योजनाच कुरण झाली आहे. या जेवणाच्या कुरणात कोण चरतो, हे वेगळे सांगायला नको, पण या योजनेची कित्येक बांधकाम कामगारांना कल्पनाही नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे डबेही पोहोचत नाही, असे वास्तव समोर येत असून याबाबत सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे.
—————
या कामाचे कंत्राटदारामार्फत देयक सादर करण्याचे काम शुभम नावाचा नागपूर येथे राहणारा इसम पाहातो. त्याच्याकडून याबाबत माहिती घेत सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझा नंबर कोणी दिला, हाच त्याचा पहिला प्रश्न होता. त्यानंतर त्याने डबे कामगारांना पोहोचवून त्याचे देयक सादर करतो, असे सांगितले. पण सातत्याने माझा क्रमांक कोणी दिला, हाच त्या शुभमचा प्रश्न होता. दरमहा बांधकाम कामगारांना हजारो डबे पोहोचविल्याचे देयक सादर केले जाते. प्रत्यक्षात तेवढे डबे पोहोचविलेच जात नसल्याचे वास्तव आहे. सारा कागदोपत्री दाखविलेला हा खेळ खंडोबा असून याचा सूत्रधार समोर आणणे गरजेचे असून कामगारांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. इसापुरात असलेल्या स्वयंपाक गृहाची जबाबदारी अजय साबळे नामक व्यक्तीकडे असून या स्वयंपाकगृहात सुरक्षारक्षकांचा चोख बंदोबस्त असतो.
पुढील भागात वाचा :
कोण आहेत हे पगारिया….. यांनाच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील कामगारांना मध्यान्ह भोजनाचा कंत्राट कसा भेटला.