हिंगणघाट बाजार समितीत सत्तेकरीता राष्ट्रवादीचा नेता म्हणविणार्या अॅड. कोठारींनी घेतला भाजपचा मुका : महाविकास आघाडीला पहिला तडा हिंगणघाटात
किशोर कारंजेकर
वर्धा : हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणुकीत आपली सत्ता कायम राहावी, याकरीता कोठलेही भान न राखता किंवा महाविकास आघाडीच्या नितिधर्माची मूल्ये पायदळी तुडवित बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी भारतीय जनता पक्षाचा मुका घेत आघाडी केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे.
अलीकडेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांच्या सभेत मुद्दामच मंचावर बसून असताना पवार साहेबासोबत आपली किती जवळीक आहे, हे दाखविण्यास अॅड. कोठारी यांनी शरद पवार साहेबांसोबत बोलण्याचे नाटक थेट मंचावर वठविले होते. त्यानंतर आता त्यांना भाजपचा पुळका आला असून त्यांनी हिंगणघाट तसेच समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या खांदावरील उपरण्याला आपल्या नेतृत्त्वातील पॅनेलच्या पदराची गाठ बांधली आहे. अॅड.कोठारी यांच्याकडे ग्रामपंचायत मतदारसंघात बहुमत नव्हते. मग यांना सत्ता जाण्याची निवडणुकीतील मतदानात सत्ता जाण्याची भिती वाटायला लागली. सत्ता है तो सबकुछ है, अशा धोरणाने ज्या भाजपने नगरपालिकेच्या निवडणुकीत अॅड. सुधीर कोठारी यांना धूळ चारली होती, त्याच भाजपसोबत महाविकास आघाडीच्या धोरणाला तिलांजली देत भाजपसोबत लाचारी स्वीकारून त्यांना संचालकपदांपैकी काही संचालकपदे बहाल करीत आघाडी केली आहे. यातून मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आम्हाला पथ्य सांगायचे, स्वत: सत्तेकरीता नसत्या लटपटी करायच्या, थेट भाजपसोबत युती करायलाही यांना काही वाईट वाटू नये, अशा सुधीर कोठारी यांच्या धोरणांची हिंगणघाट शहरात टवाळी सुरू झाली आहे. भाजपलाच मोठे करायचे होते, तर मग अॅड. कोठारी यांनी शरद पवार यांचे निष्ठावान म्हणत, वागणे बंद करायला पाहिजे होते, असे सहकार गटातील मतदारही बोलू लागले आहेत.
एकीकडे राष्ट्रवादीचा नेता म्हणून घ्यायचे, दुसरीकडे भाजपसोबत बाजार समितीच्या निवडणुकीत हातमिळवणी करायची, यातून राष्ट्रवादीचे हिंगणघाट तालुक्यात अहितच झाले असून याचे दूरगामी परिणाम येथील राजकारणात होणार आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत याचे पडसाद अधिक स्पष्टपणे दिसतील, असे मतदार बोलत आहेत. आता सुधीर कोठारी यांनी राष्ट्रवादीचा नेता म्हणून स्वत:चा उल्लेख करून घेण्याऐवजी नवीन बिरुद शोधावे, असे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते म्हणायला लागले आहेत. सत्तेकरीता पक्षाची धोरणे पायदळी तुडविणार्या या नेत्याचे रंगबदलूपण बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे.
क्रमश :