Breaking
ब्रेकिंग

वर्ध्यात “स्मार्टडील”च्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चूना, गंडा घालणाऱ्या “बंटी-बबली”चा शहरातून पोबारा

2 2 5 3 5 5

सचिन धानकुटे

वर्धा : – अर्ध्या किमतीत वस्तू खरेदी करण्याच्या नादात एका दाम्पत्याने अनेकांना लाखो रुपयांचा चूना लावल्याची घटना शहरात नुकतीच उघडकीस आली. ग्राहकांसह सेल्समनला गंडा घालणाऱ्या “त्या” दाम्पत्याने सध्या शहरातून पोबारा केला असून याप्रकरणी दोघांवरही शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्राप्त माहितीनुसार, शहरातील बॅचलर रोडवरील शशांक शर्मा यांच्या निवासस्थानी प्रशांत भाऊसाहेब निन्नावने आणि त्यांच्या अर्धांगिनी ममता या दोघांनीही स्मार्टडील नामक कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. स्मार्ट डीलच्या नावाखाली येथून किराणा, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फ्लॅट, कार, दुचाकीसह इतर वस्तू ग्राहकांना अर्ध्या किमतीत देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी आशिष भागोराव पराते, सपना रविकांत कळमकर, निता पुरुषोत्तम लक्षणे, योगिता निलकंठ सलामे आणि माया महल्ले आदिंची सेल्समन म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली. दरम्यान त्या सेल्समनला कोणत्याही प्रकारचे नियुक्तीपत्र अथवा ओळखपत्र देण्यात आले नाही हे विशेष.. निन्नावने दाम्पत्याने सेल्समनच्या माध्यमातून ग्राहकांना दहा हजारांची वस्तू पाच हजार रुपयात मिळणार असल्याचे आमिष दाखविले. २४ तासाच्या आत पैसे भरल्यास ग्राहकांना २१ दिवसात वस्तू मिळणार होती. जिल्ह्यातील अनेकजण या आमिषाला बळी देखील पडले. सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर ग्राहकांनी सेल्समनच्या माध्यमातून रक्कम निन्नावने दाम्पत्याच्या स्वाधीन केली. पाचही सेल्समनने जवळपास ३१ लाख १४ हजारांची रक्कम त्या दाम्पत्याच्या हवाली केली. परंतु एकाही ग्राहकाला वस्तू मात्र मिळाली नाही. दरम्यान गंडा घालणारे दाम्पत्य आधीच आपले मोबाईल बंद करून सोयीस्करपणे शहरातून पसार झालेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्या दाम्पत्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 3 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे