भरधाव कारची दुचाकीला जबर धडक ; दुचाकीचालक गंभीर जखमी ; मद्यप्राशन केलेल्या कारचालकास नागरिकांनी दिला भत्ता
सचिन धानकुटे
सेलू : – भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास येथील पंचायत समितीच्या समोर घडली. नितीन शंकरराव तडस(वय३०) रा. घोराड असे सदर अपघातात जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, घोराड येथील नितीन तडस हा आपल्या एमएच ३१ डीई ६४८७ क्रमांकाच्या दुचाकीने सेलूकडे निघाला होता. दरम्यान त्याच्या पाठीमागून एमएच ३३ ए ५१९९ क्रमांकाची भरधाव स्विफ्ट कार त्याच्या दुचाकीवर मागाहून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, यात दुचाकीसह चालक वीस फुट हवेत उडून जमिनीवर कोसळले तर कार रस्ता दुभाजकाला भेदत विरुद्ध दिशेच्या दोन दुचाकींना उडवत बँरीकेट तोडून थेट विजेच्या खांबावर धडकली. सदर अपघातात दुचाकी चालकाच्या हातपाय व डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तत्काळ उपस्थितांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.
सदर अपघातातील कारचालक हा मद्यप्राशन करून कार चालवत होता. त्याने आधी हिंगणीजवळ देखील एका वाहनाला धडक दिल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर तो पळ काढण्याच्या तयारीत होताच, परंतु त्याची कार विजेच्या खांबाला धडकल्याने नागरिकांनी त्याला बाहेर काढून चांगलाच भत्ता दिला. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकास ताब्यात घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.