दिवसाआड धावणारी लालपरी, विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक..! जुवाडी-नानबर्डी येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय
सचिन धानकुटे
सेलू : – एसटी महामंडळाच्या अनियमित कारभारामुळे जुवाडी आणि नानबर्डी येथील विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी वाहतूक नियंत्रकांना गाठत याविषयी जाब विचारला, परंतु कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सेलू येथून वडगांव, जुवाडी, नानबर्डी अशी एसटी महामंडळाची बसफेरी आहे. या सकाळी ९ वाजताच्या बसफेरीवर शाळकरी विद्यार्थ्यासह प्रवाशांची भिस्त असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर बसफेरी अनियमित झाली. दिवसाआड धावणाऱ्या या बसफेरीमुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाताना अडचणी निर्माण होतात. त्यांच्या शिक्षणात खंड पडतोय. यासंदर्भात आज स्थानिक पालकांनी विद्यार्थ्यां समवेत सेलूच्या वाहतूक नियंत्रकांना गाठले. याविषयी जाब विचारला असता त्यांनी बस बंद पडल्याची व्यथा मांडली. एक दिवस ठीक आहे, परंतु दिवसाआड बस कशी काय बंद पडणार, यावर मात्र वाहतूक नियंत्रक निरुत्तर झाले. त्यामुळे याविषयी तत्काळ तोडगा न निघाल्यास प्रसंगी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांकडून देण्यात आला. एसटी महामंडळ यावर काय निर्णय घेते याकडे प्रवाशांसह, पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.