गावगुंडाच्या हत्या प्रकरणात सेलू (मुरपाड) येथील अकरा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सचिन धानकुटे
वर्धा : – गावगुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी त्याची हत्या केल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील सेलू(मुरपाड) येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी गावातीलच अकरा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील मृतक आकाश उल्हास उईके(वय३०) हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात चोरी, गुंडागर्दी करीत दहशत निर्माण करणे अशाप्रकारचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो नुकताच चार दिवसांपुर्वी एका गुन्ह्यात कारागृहातून सुटका होवून बाहेर आला होता. स्थानिक रहिवासी त्याच्या कारवायामुळे चांगलेच त्रस्त होते. बुधवार ता.९ रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत गावातीलच काही दारू विक्रेत्यांकडे दारूसाठी गेला, परंतु त्याला दारु न मिळाल्याने त्याने काही लोकांना त्रास देत गावात दहशत निर्माण केली. यादरम्यान गजानन खडसे नामक युवकाच्या मोटरसायकलला त्याने लात मारून खाली पाडले. यानंतर तो पुन्हा वाद करीत स्थानिक ग्रामपंचायत समोरील चौकात पोहचला. यावेळी तेथे उपस्थित तरुणांशी त्याने पुन्हा वाद घातला. त्याच्या अशाप्रकारच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही तरुणांनी त्याला वीट मारत यावेळी जखमी केले. दरम्यान काहिंनी लाठ्याकाठ्या हातात घेऊन त्याला बेदम चोप दिला. यात जखमी झालेल्या त्या गावगुंडास उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी गावातीलच शरद अशोकराव सातपुते (वय३४), पांडुरंग मारोती देवतळे (वय४४), गजानन सुर्यभान खडसे(वय३८), प्रकाश सूर्यभान खडसे (वय४२), जितेंद्र सुभाष गौळकार (वय३४), चंद्रशेखर रामू मांडकर (वय२५), गोपाल सोनू पवार (वय२०), वैभव प्रमोद धोटे (वय२८), धनराज वसंतराव धापेकर (वय३०), आकाश बंडूजी भांडेकर (वय२७) व अतुल शंकर बोरकर (वय२८) सगळे राहणार सेलू(मुरपाड) अशा अकरा जणांविरोधात भांदवि कलम ३०२, ३२३, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.