Breaking
ब्रेकिंग

सेलूत पाणी पुरवठा योजनेचा पाणी अडवा अन् जिरवा उपक्रम..! कंत्राटदाराकडून सांडपाण्याच्या नाल्यांचा सत्यानाश

2 6 9 0 8 9

सचिन धानकुटे

सेलू : – शहरात ४३ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. याकरिता कंत्राटदारांकडून शहरातील सांडपाण्याच्या नाल्यांचा पार सत्यानाश करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या हाती घेण्यात आल्याने शहरात “पाणी अडवा पाणी जिरवा” उपक्रम तर राबविला जात नाही ना..! अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

       पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सांडपाण्याच्या नाल्यांचा पार सत्यानाश केलायं. याठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी जो खड्डा खणण्यात आलायं, त्यात झाडांचा तर बळी दिलाचं, याशिवाय सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा देखील पार सत्यानाश करुन टाकला. खड्डा खणताना सुस्थितीत असणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यांचे मुळात अस्तीत्वचं नाहीसं करुन टाकण्याचे काम कंत्राटदाराने केले आहे. सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची लगबग सुरू असून याठिकाणी देखील सभामंडपात देवी विराजमान होते. त्यामुळे कंत्राटदाराने मागचा पुढचा कोणताही विचार न करता चक्क सांडपाण्याची नाली जमिनदोस्त केली. हे सगळे करताना केवळ एका छोट्याश्या व्यासाचा पाईप त्यात टाकून नाली चक्क बुजविण्यात आलीयं. त्यामुळे सांडपाणी वाहून जाणे तर दुरचं, ते त्याठिकाणी जिरुन दुषित पाणी पुरवठा होण्याचीच शक्यता अधिक आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये सुद्धा घडलायं. याठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याच्या नळातून दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

        पाणी पुरवठा योजनेच्या कामा दरम्यान नासधूस करण्यात आलेल्या रस्ता व तत्सम कामांसाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीयं. यातील मलिंदा लाटण्यासाठीच सध्या स्थानिक लोकप्रतिनिधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहे. कंत्राटदारांकडून प्रभागातील सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यांसह सांडपाण्याच्या नाल्यांची पार वाट लावली जात असताना नगरसेवक महोदय मात्र केवळ मूकदर्शकाच्या भुमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 0 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे