सेलूत १५ ऑगस्टला जिल्हा स्तरीय दौड स्पर्धा, साहसिक जनशक्ती संघटनेचे आयोजन
सचिन धानकुटे
सेलू : – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहरात जिल्हा स्तरीय दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
स्वांतत्र्य दिनाच्या औचित्यावर गुरुवार ता.१५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य जिल्हा स्तरीय दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शहरातील बसस्थानकापासून स्पर्धा प्रारंभ होईल. याकरिता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना निःशुल्क प्रवेश घेता येणार आहे. ही स्पर्धा आठ विभागात आयोजित करण्यात आली असून मुलांसाठी १२ वर्षाआतील गटात एक किलोमीटर, १६ वर्षाआतील मुलांसाठी तीन किलोमीटर, खुल्या गटासाठी पाच किलोमीटर तर मुलांच्या ओपन ग्रुपसाठी १६०० मिटर अंतर स्पर्धकांना कापायचे आहे.
मुलींसाठीच्या १२ वर्षाआतील गटात एक किलोमीटर, १६ वर्षाआतील आणि खुल्या गटात तीन किलोमीटर अंतर मुलींना कापायचे आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचं आकर्षण असलेलं ४० ते ६५ वर्षं वयोगटातील चिरतरुणांसाठी देखील एक किलोमीटर अंतर कापण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेतील विविध गटांसाठी लाखांच्यावर बक्षीसांची उधळण करण्यात आली असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक युवा साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सागर राऊत यांनी दिली. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी मयूर बोकडे 9511861547, सुनिल गौतम 7719086308, कैलास बिसेन 9175873508 व आकाश नौकरकार 9096061165 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी केले.