धारदार शस्त्राच्या जोरावर लूटमार करणाऱ्या भामट्यांची टोळी गजाआड
सचिन धानकुटे
वर्धा : – धारदार शस्त्राच्या जोरावर बळजबरीने लूटपाट करणाऱ्या भामट्यांना काल रात्रीच गजाआड करण्यात आले. ही कारवाई अवघ्या २४ तासाच्या आत दक्ष नागरिकांच्या सहकार्याने सेवाग्राम पोलिसांनी केली.
पवनार ते वरुड रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांची वाट अडवून त्यांना मारहाण करीत लुटणाऱ्या टोळक्याची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. मंगळवारी रात्री खेलकर यांच्या शेताजवळ सेलूच्या एका डॉक्टरसह पवनार येथील तीघांना याच टोळीने मारहाण करीत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. यासंदर्भात सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल होताच, पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान काल बुधवारला रात्री साडेनऊच्या सुमारास ज्या ठिकाणी मंगळवारी घटना घडली, नेमक्या त्याच ठिकाणावर नागरिकांना काही जण संशयास्पद रित्या फीरताना आढळले. नागरिकांनी मोठ्या शिताफीने यातील तीघांना पकडून ठेवत यावेळी चांगलाच भत्ता दिला. यासंदर्भात लागलीच पोलिसांना देखील माहिती कळविण्यात आली आणि त्यांनी “त्या” तीघांनाही ताब्यात घेऊन त्यांचा पोलिसी समाचार घेतला असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले असून यात पाच विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. यापैकी राहुल दादाराव जाधव(वय२१) रा. आर्वी नाका, वर्धा व अर्जुनसिंग संतोषसिंग बावरी(वय२२) रा. शिखबेडा सावंगी(मेघे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटकर, संजय लोहकरे, हरिदास काक्कड, गजानन कठाणे, पवन झाडे आदि कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटकर करीत आहे.