अतिशय धक्कादायक : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक मृतविवाहितेला न्याय देतील का ? सासरे विठ्ठलराव ठाकरे यांनी दिले निवेदन
किशोर कारंजेकर
वर्धा : – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेसह तीच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नवजात बालकासह त्याच्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांची चौकशी करीत कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आज संबंधित कुंटुबियांकडून पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लादगड येथील महिलेस प्रसूतीसाठी मंगळवार ता.१७ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तेथील डॉक्टरांनी सदर महिलेची नार्मल प्रसूती करणार असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. दरम्यान शुक्रवार ता.२० रोजी सकाळच्या सुमारास सदर महिलेस अचानक सिझेरियनसाठी नेण्यात आले. यावेळी सदर महिलेच्या पोटावर जखम झाल्याने तीच्या ओरडण्याचा आवाज कुटुंबातील सदस्यांना आला. त्यांना काही कळायच्या आतच रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी सदर महिलेस अत्यवस्थ अवस्थेत सेवाग्राम येथील रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल केले. यावेळी महिलेच्या पतीसह एक वृद्ध महिला देखील तेथे हजर होती. काही वेळानंतर तेथे त्यांना नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शनिवार ता.२१ रोजी त्या नवजात बालकावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. अशातच एक दिवसानंतर म्हणजेच सोमवारी सदर महिलेचा देखील मृत्यू झाला.
यातील नवजात बालकासह त्याच्या आईच्या मृत्यूला जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारिका जबाबदार असून सदर प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आज मृतक महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांना दिले. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर व परिचारिका यांच्या चुकीमुळे मृत्यू झालेल्या नवजात बालकासह त्याच्या आईला न्याय मिळणार का..? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.