वर्ध्यात शनिवार आणि रविवारी शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
सचिन धानकुटे
वर्धा : शासकीय विद्यानिकेतनच्या चिखलदरा-अमरावती या निवासी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा शनिवार आणि रविवार दि. १३ व १४ जानेवारी रोजी स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून १९६७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून शासकीय विद्यानिकेतनांची महाराष्ट्रात स्थापना करण्यात आली. इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश देऊन इयत्ता दहावीपर्यंत निवासी शाळा चिखलदरा, कोयनानगर, औरंगाबाद, धुळे येथे स्थापन करण्यात आल्यात. कालांतराने चिखलदरा येथील विद्यानिकेतनाचे स्थानांतरण अमरावती येथे व कोयनानगरचे स्थानांतरण पुसेगाव येथे करण्यात आले. १९८१ मध्ये राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथे विद्यानिकेतन सुरू करण्यात आले.
राज्यातील सर्व विद्यानिकेतनाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत माजी विद्यार्थी कल्याण संघाची स्थापना करून शासकीय विद्यानिकेतनात आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी चिखलदरा-अमरावती विद्यानिकेतनातील माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून एकत्र येतात.
ता. १३ व १४ जानेवारी रोजी वर्धा येथे मातोश्री मंगल कार्यालयात विद्यानिकेतनाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक तथा विद्यानिकेतनाचे माजी प्राचार्य भाऊसाहेब गावंडे करणार आहेत. अध्यक्ष म्हणून विद्यानिकेतन माजी विद्यार्थी कल्याण संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डॉ. प्रवीण सुंदरकर राहणार आहेत. कार्यक्रमाला विद्यानिकेतनाचे माजी शिक्षक तथा सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अशोक वाकोडे, ना. श्री. भारतीय हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी कल्याण संघाचे सचिव प्रशांत ढाकुलकर आणि विद्यानिकेतन परिवारातील ज्येष्ठ विद्यार्थी सुरेश शिरभाते, जयंत तलमले उपस्थित राहणार आहेत.
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे. तसेच माजी विद्यार्थी कल्याण संघाची आमसभा रविवारी ता.१४ रोजी संपन्न होणार आहे. माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे.
स्नेह मिलन-२०२४ या कार्यक्रमात शासकीय विद्यानिकेतन चिखलदरा-अमरावती येथे शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. रवीदत्त कांबळे, बाळकृष्ण घोडकी, संजय मानकर, अविनाश घोडे, राजेंद्र कडूकर, प्रदीप गोमासे, हेमंत तलमले, रवींद्र लवणे, चंद्रशेखर ठाकरे, किशोर उकेकर, मोहन सायंकाळ, संजय भोमले, रवींद्र काटोलकर, ओमप्रकाश बकाल, राजेश डेहनकर, डॉ पुरुषोत्तम माळोदे, विवेक इलमे, सुनील उमरे, प्रशांत चव्हाण, महेश खडसे, प्रशांत ढोले आदींनी केले आहे. अशी माहिती विद्यानिकेतनाचे माजी विद्यार्थी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.