सेलूच्या महिलेस भामट्यांनी घातला गंडा ; गळ्यातील पोत घेऊन भामटे “नौ दो ग्यारह”
सचिन धानकुटे
सेलू : – येथील एका महिलेस भामट्यांनी गंडा घालत तीच्या गळ्यातील पोत घेऊन भामटे पसार झाल्याची घटना बाजार ओळीतील दुकानात घडली. याप्रकरणी पोलिसांत दोन अज्ञाता विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील आठवडी बाजाराच्या रस्त्यावर सदर महिलेच्या मुलाचे दुकान आहे. शनिवारी मुलगा हा बाहेरगावी गेल्याने महिला एकटीच दुकानात होती. यावेळी दोन भामटे दुकानात आले आणि त्यांनी एक रुमाल खरेदी केला. यासाठी त्या भामट्यांनी महिलेला शंभर रुपये देखील दिले आणि महिलेने त्यांना उर्वरित सत्तर रुपये परत केले. दरम्यान त्यांनी महिलेस परिसरातील दर्ग्याच्या बाबतची माहिती विचारली. आमच्या आईचे आपरेशन झाले असून आम्हाला दरगाहवर पैसे दान करायचे आहे, असे म्हणून महिलेची दिशाभूल केली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेली कागदाची पुडी काढून टेबलावर ठेवली आणि त्यावर काही पैसे ठेवलेत. महिलेस तीच्या गळ्यातील पोत काढून त्या पुडीस संपर्क करण्याचे सांगितले. त्यानंतर ती पोत पुडीत बांधून एका पिशवीत भरली आणि ती पिशवी महिलेच्या स्वाधीन केली.
थोड्याच वेळात दोन्ही भामटे तेथून पसार झाले, तेव्हा महिलेने ती पिशवी उघडून बघितली असता त्यात पोत नसल्याचे दिसून आले. याऐवजी त्यात नारळ, हळद, कुंकू आणि अगरबत्तीच आढळून आली. सदर महिलेस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, याप्रकरणी रविवारी सेलू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही अज्ञात भामट्यां विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वपनिल भोजगुडे करीत आहे.
याआधीही सेलूत एका वृद्धास अशाच प्रकारे गंडा घालून त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी घेऊन भामटे पसार झाले होते हे विशेष…