वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात ; १६ जण जखमी ; दोघांची प्रकृती चिंताजनक
राजू डोंगरे
आर्वी : – लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या वाहनाचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाल्याची घटना आज रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सदर अपघात आर्वी ते वर्धा मार्गावरील चांदनी फाट्याजवळ घडला असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तालुक्यातील काजळी येथील लग्नाची वरात घेऊन एम एच ४० एन ३७४६ क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स अमरावती जिल्ह्यातील वऱ्हा-कुऱ्हा नजिकच्या सालोरा येथे गेली होती. सदर लग्नसोहळा आटोपल्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्स वरात घेऊन आर्वी मार्गे निघाली. दरम्यान आर्वी ते वर्धा मार्गावरील चांदनी शिवारात ट्रॅव्हल्सचा समोरील टायर फुटल्याने ती अनियंत्रित होत रस्त्याशेजारच्या नाल्यात फसली. सदर अपघातात जवळपास १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनमचे पोलीस निरीक्षक संतोष शेगांवकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पुढील तपास खरांगणा पोलीस करीत आहे.