बचतगटाच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे ; जागतिक महिला दिनी भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाचा उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – बचतगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वंयरोजगार तसेच व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर भारत सरकारच्या श्रम मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास मंडळाच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिलांना शासकीय योजनांविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
रेहकी येथील संत गोपिकाबाई देवस्थान सभागृहात आज जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटाच्या महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या श्रम मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या शिक्षा अधिकारी गरिमा उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे क्षेत्रीय निर्देशक सी डब्ल्यू वैद्य, स्वनंद गोविज्ञान संस्थेचे चंद्रशेखर चावरे, संजिव कुमार, आरोग्य विभागाचे राहुल जिवने, कृषी विभागाचे किशोर पोहाणे, लोकमतचे पत्रकार संघर्ष जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वंयरोजगार व व्यवसाय प्रशिक्षणासह आरोग्य विषयक तसेच शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच बचत गटातील एससी व एसटी महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, वैयक्तिक कर्ज, कृषी साहित्य, समाज कल्याण विभागाच्या योजना, ई-श्रम व पेंशन योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना संदर्भात देखील माहिती देण्यात आली. यावेळी महिलांना गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंचे देखील प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बचतगटाच्या छकुली सावरकर, मिनाक्षी झाडे यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला बचतगटाच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शासनाकडून यात सहभागी महिलांसाठी विशेष मानधनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन सविता थराते, कल्पना गहरोले यांनी तर आभार अंगणवाडी सेविका दर्शना धानकुटे यांनी मानले.