चारचाकी वाहनात सापडली सात लाखांची रक्कम..! निवडणूक विभागाच्या पथकाची येळाकेळी चेक पोस्टवर कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – एका चारचाकी वाहनात तब्बल सात लाख रुपयांची रक्कम निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाला वाहनांच्या तपासणी दरम्यान आढळून आली. येळाकेळी येथील चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी वाहन ताब्यात घेत तपासाला गती दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने विविध ठिकाणी चेक पोस्टद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. येळाकेळी येथील चेक पोस्टवर आज पुण्याहून आलेल्या एका स्विफ्ट कारची तपासणी करण्यात आली. दरम्यान त्या कारमध्ये सात लाख रुपयांची रक्कम निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली. स्थानिक पोलिसांनी तसेच तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर वाहनासह रक्कम ताब्यात घेतली आहे. निवडणूक विभागाकडून सदर रक्कमेची तपासणी केली जाणार असून निवडणूक विभागाच्या पथकाकडून यासंदर्भात तपास सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.