बोगस बियाणे प्रकरणातील मुख्य आरोपीस २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी ; सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
सचिन धानकुटे
वर्धा : – बोगस बीयाणे प्रकरणातील मुख्य आरोपीस २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी तर सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत आज रवानगी करण्यात आली.
म्हसाळा परिसरातील बोगस बियाण्यांच्या कारखान्याचा पोलिसांनी सोमवार ता.१२ रोजी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी राजू जयस्वाल सह एकूण सोळा जणांवर विविध कलमान्वये सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पंधरा सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. यातील मुख्य आरोपीसह एकूण दहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून सहा आरोपी अद्याप फरार असल्याचे एसआयटी प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितले. सहा फरार आरोपीमध्ये गुजरात येथील दोन, अमरावती येथील दोन, वरोरा आणि वर्धा येथील प्रत्येकी एका आरोपींचा समावेश आहे. यातील आठ आरोपींना सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्याने पुनश्च आठही आरोपींना आज बुधवारला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने मुख्य आरोपी राजू जयस्वाल यास २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर उर्वरीत सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यापूर्वी यातील एका चव्हाण नामक आरोपीची आधीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. फरार असलेल्या आरोपीपैकी वर्धा येथील गजू ठाकरे आणि वरोरा येथील प्रविण जगताप ह्या दोन्ही आरोपींनी सध्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सांगितले जाते. गुजरात येथील दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सेवाग्राम पोलीस ठाण्याचे विशेष पथक तीन दिवसांआधीच रवाना झाले.