हिंगणघाट तालुक्यातील दोंदूड्यात अग्नितांडव..! तीन शेतकऱ्यांच्या गोठ्यांची राखरांगोळी, जनावरांसह शेतीसाहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान
सचिन धानकुटे
वर्धा : – हिंगणघाट तालुक्यातील दोंदूडा येथे काल रविवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांच्या गोठ्यांची अक्षरशः राखरांगोळी झाली. या अग्नितांडवात जनावरांसह शेतीसाहित्य देखील जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले तर दोन बैलांना आगीच्या झळा लागल्याने ते जखमी झालेत.
दोंदूडा येथे काल रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अचानक एका गोठ्याला आग लागली. आगीने बघता-बघता लगतच्या दोन गोठ्यांना देखील आपल्या कवेत घेतले. या अग्नितांडवात शेतकरी भानुदास डोमाजी उगे यांचा संपूर्ण गोठ्यासह शेतीसाहित्य जळून खाक झाले. वसंता गणपत शेंडे नामक शेतकऱ्याचे एक वासरू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले तर दोन बैल जळाल्याने गंभीर जखमी झाले. किशोर गुडदे नामक शेतकऱ्याच्या गोठ्यातील संपूर्ण शेतीसाहित्य, गव्हाच्या थैल्या व पाईप्स जळाले. तीनही शेतकऱ्यांचे या अग्नितांडवात जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांना आगीची माहिती कळताच त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शेवटी अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान यावेळी सतर्कतेच्या दृष्टीने गावातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. सदर घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर आग नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आज महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचा आढावा घेण्यात आला.