वर्ध्याच्या नामांकित शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू : मोह जीवावर बेतला : रायपूरच्या घोगरा धबधबा परिसरातील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – धबधब्याच्या सानिध्यात पार्टी तसेच मौजमजा करण्याच्या नादात शाळकरी विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी चार वाजताच्या सुमारास रायपूर परिसरातील घोगरा धबधब्यावर घडली. यात तीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला तर एका मित्राने मात्र त्यांना मदत करण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला. सुजल बाबाराव अवताडे(वय१६) रा. विनायक शाळेजवळ, कारला चौक, वर्धा व ओम अनिलराव धुर्वे(वय१७) रा. इंदिरानगर आदिवासी कॉलोनी, वर्धा अशी या दुर्घटनेतील मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या एका नामांकित शाळेतील दोन विद्यार्थी तसेच त्यांचा एक मित्र असे तिघे जण पार्टी तसेच मौजमजा करण्याच्या उद्देशाने आज पंचधारा नदी परिसरात आले होते. यावेळी त्यांनी पंचधारा नदीवरील रायपूर परिसरातील घोगरा धबधब्याची निवड केली. यावेळी त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही, दुपारी चार वाजताच्या सुमारास यातील एक जण पोहता पोहता अचानक पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र धावला, परंतु तो देखील पाण्यात गंटागळ्या खावू लागला. यावेळी उपस्थित एकाने मात्र त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला. या दुर्घटनेत दोघांचा पाण्यात बुडाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्यातील प्रकाश भोयर व अमोल राऊत तत्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.