सुशांत येडाखेची हत्त्या… की आणखी काही : सुशांतने घरी मागितले होते पाच लाख

किशोर कारंजेकर
वर्धा : आत्ताच माझ्या बँक खात्यात पाच लाख रुपये ट्रान्सफर करा असा घरातील व्यक्तीला काल रात्री फोन करून मोबाईल बंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तळेगाव (टालाटुले) परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. हा मृतदेह सुशांत दिलीप येडाखे (वय 35) रा. हरिओमनगर, वर्धा यांचा असल्याने सुशांतची हत्त्या की, आणखी काही अश्या संभ्रमात पोलीस विभागाने तपासाला गती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सुशांत येडाखे यांचे वर्ध्याच्या आरती चौकात मेहेर आटोमोटिव नावाचे सेकंडहॅन्ड चार चाकी वाहने खरेदी – विक्रीचे दुकान आहे. त्याने काल रात्री सव्वा दहा वाजता दुकान बंद केले होते. त्यानंतर काही वेळाने सुशांतने स्वतःच्या घरी फोन करून माझ्या बँक अकाउंटमध्ये आत्ताच पाच लाख रुपये ट्रान्सफर करा, असा फोन केला होता. त्यानंतर मोबाईल बंद झाला. रात्री सुशांतशी घरच्यांचा कुठलाही संपर्क होऊ शकला नाही.
आज सकाळी सुशांत मृतावस्थेत तळेगाव परिसरात आढळून आला. या घटनेची अल्लीपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सुशांतच्या डोक्यावर गंभीर इजा दिसून येत असल्याने पोलिसांनी घातपात केल्याच्या दिशेने आपला तपास सुरु केला आहे.