“त्या” वसूलीबाज उपनिरीक्षकाची मुख्यालयात उचलबांगडी
सचिन धानकुटे
सेलू : – पैशासाठी वृद्ध इसमास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या “त्या” पोलीस उपनिरीक्षकाची कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी नुकतीच मुख्यालयात उचलबांगडी केली. विजय कापसे असे “त्या” वसूलीबाज पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर विजय कापसे कार्यरत होते. रविवार ता.१८ रोजी घोराड येथील ५८ वर्षीय वृद्ध इसमास त्यांनी पोलीस ठाण्यातच अमानुषपणे मारहाण केली. मारहाणीनंतर वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावा लागला. सदर इसम मधुमेहाच्या आजाराने बाधित होता आणि त्यांना वेळीच इन्सुलिन न मिळाल्याने त्यांची प्रकृती पोलीस ठाण्यातच चिंताजनक झाली होती हे विशेष..
सदर मारहाण ही हप्तेखोरीच्या नादात झाल्याचे उघडकीस आल्यानंतर यासंदर्भात पत्रकार परिषद घेत “त्या” पिडीताने आपली व्यथा मांडली. याप्रकरणी जाधव कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची देखील प्रत्यक्ष भेट घेऊन न्यायाची मागणी केली. यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी चौकशीअंती दोषी आढळल्यास तत्काळ कारवाईचे आश्वासन सदर कुटुंबातील सदस्यांना दिले होते. त्यानुसार सदर वादग्रस्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजये कापसे यांची नुकतीच पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. यासंदर्भात शुक्रवारी तसा आदेशही निघाल्याचे कळते. परंतु यानंतरही “त्या” वादग्रस्त कर्मचाऱ्याने शनिवारी झडशी बिटात वसूलीसाठी फेरफटका मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.