आर्वी-तळेगांव रस्त्याचा “सत्यानाश” करणाऱ्या अभियंत्याचा हारतुऱ्याने सत्कार ; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील आर्वी-तळेगांव रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळल्याने अपूर्ण अवस्थेत आहे. हा रस्ता आवागमनासाठी डोकेदुखी ठरत असल्याने रस्त्याचा सत्यानाश करणाऱ्या अभियंत्याचा आज सामाजिक कार्यकर्त्यांनी हारतुऱ्यांनी चक्क सत्कार केला. सदर प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्तरेच एकप्रकारे वेशीवर टांगण्यात आल्याचे दिसून येते.
आर्वी-तळेगांव या दहा किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय होत असल्याने वाहनधारकांना तसेच आवागमन करणाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. आर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव जाजू तसेच मित्र परिवारातील सदस्यांनी आज सदर कामाची पाहणी करणाऱ्या अभियंता टाके ह्यांचा कामाच्या ठिकाणी भेट देत पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला. निदान यामुळे तरी प्रशासन खडबडून जागे होईल आणि रेगांळलेल्या कामास गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.