स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा थाटात
सचिन धानकुटे
वर्धा : – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येथील स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने मंगळवारी श्री छाया मुलांच्या बालगृहात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नालवाडी येथील श्री छाया बालगृहात जवळपास ११० पेक्षा अधिक बालक वास्तव्य करतात. यावेळी त्यांचा केक कापत आणि खाऊचे वाटप करून सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर स्वप्नपूर्तीचे जिल्हा समिती सदस्य युगांत नंदरे यांनी स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. बालकांची व्यथा व कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतू त्यांना आपण आपल्या घरातील सदस्य मानले तर क्रांतिकारी बदल व्हायला वेळ लागणार नाही, त्यासाठी नागरिकांनी मदतीचा एक हात द्यावा, असे आवाहन देखील नंदरे यांनी याप्रसंगी केले.
सदर कार्यक्रम हा एकदिवसीय उपक्रम नसून स्वप्नपूर्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. यावेळी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार स्वप्नपूर्तीचे स्वयंसेवक संकेत बुकने, यश ठाकरे, प्रबुद्ध आडे, कुणाल आत्राम, रवींद्र घरत, सक्षम लोहकरे, प्रज्वल भडे, हर्षल मेश्राम, सर्वेश राठोड, प्रतिक्षा साखरकर यांनी यावेळी केला.