वाहन चालक, कर्मचारी, कंत्राटदार आणि जी हुजुरी करणारे ठरले “व्ही व्ही आय पी” : जाणता राजा महानाट्याच्या नियोजनाचा फज्जा
किशोर कारंजेकर
वर्धा – तब्बल आठ हजार आसन व्यवस्था असणाऱ्या जाणता राजा महानाट्याच्या आसन व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महानाट्याचे आयोजन करण्यात आले. याच्या सर्वाधिक पासेस कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या. व्ही व्ही आय पी, व्ही आय पी आणि सर्वसाधारण अशी आसन व्यवस्था करण्यात आली. पण या आसन व्यवस्थेच्या दरम्यान करण्यात आलेल्या नियोजनाचा फज्जा या दरम्यान पहायला मिळाला आहे.
व्ही व्ही आय पी ही सर्वात समोर असणारी आसन व्यवस्था नेमकी कुणासाठी असा प्रश्न यावेळी नेमका उपस्थित झाला आहे. व्ही व्ही आय पी या आसन व्यवस्थेवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देखील पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना जाब विचारला होता. सुरुवातीला दोन्ही दिवस या व्हीव्ही आय पी आसनावर विविध विभागाचे कर्मचारी, कंत्राटदार आणि प्रशासनाची नेहमीच जी हुजुरी करणारे एजंट सर्वाधिक पाहायला मिळाले आहे.
नाटकाचा सेट मध्यभागी असल्याने मागे बसलेल्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या प्रेक्षकांना या आसनावरून फारसे व्यवस्थित नाटक पाहता आले नाही. उभे राहून अथवा डोके वर काढून पाहणाऱ्यांची देखील गोची झाली. जिल्हा प्रशासनाने या पासेस नेमक्या सन्मानाने वितरित केल्या की विकल्या हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे हे व्हीव्हीआय पी प्रवेश द्वारावर पहारा ठेऊन असताना दिसले. पण यावेळी नेमके एजंट आणि कंत्राटदार यांच्या परिचयातील व्यक्तींना येथे आवर्जून प्रवेश मिळत असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.
8 बाय 12 च्या केवळ 2 स्क्रीन लावून हजारो लोकांना पाहण्याची व्यवस्था या मैदानावर असली तर प्रेक्षक मात्र थेट पाहून समाधान मानताना दिसून आले. ही स्क्रीन खरोखरच आठ हजार प्रेक्षकांना पुरेशी होती का, हे पाहणेही गरजेचे आहे. 2 कोटी पेक्षा जास्त रुपयांची उधळण झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यात येथील आसन व्यवस्था अपुरी पडली, असेच प्रत्येक प्रेक्षकांचे मत होते.