महाविकास आघाडीच्या डोक्याला बंडोबांचा ताप, महायुतीतही टेन्शन..! वर्ध्यात काँग्रेसच्या वाटेत फुलापेक्षा कॉंटेच जास्त..!!
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवारांनी बंडाचा झेंडा आपल्या हाती घेतलायं. त्यामुळे वर्धा आणि हिंगणघाट मतदारसंघात महाविकास आघाडी तर आर्वीत महायुतीच्या गोटात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वर्धा विधानसभा मतदारसंघ हा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या वाट्याला गेलायं. याठिकाणी काँग्रेसकडून शेखर शेंडे, डॉ सचिन पावडे, डॉ अभ्युदय मेघे व सुधीर पांगुळ अशा चौघांनाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. काँग्रेसने मात्र याठिकाणी तीन वेळा पराभूत झालेल्या उमेदवारालाच पसंती दिली. त्यामुळे साहजिकच गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करणाऱ्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करीत महाविकास आघाडीला चांगले घामाघूम केले आहे. काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा याठिकाणी अपक्ष उमेदवार डॉ सचिन पावडे यांच्याकडे सुजाण मतदार तीसरा पर्याय म्हणून पाहत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या भव्य नामांकन रॅलीने अनेकांना धडकी भरल्याचे कळते. सुधीर पांगुळ यांनाही मानणारा एक मोठा वर्ग आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देखील दावा करण्यात आला होता. समीर देशमुख यांनी गेल्यावेळी देवळीत तर यावेळी वर्ध्यातून लढण्याची तयारी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने देखील त्यांना यासंदर्भात आश्वस्त केले होते. परंतु खासदार अमर काळे यांनी वर्ध्याऐवजी आर्वी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला कसा सुटेल आणि आपल्या सौभाग्यवतीच आमदार होतील, यासाठी खासदारकी खर्ची घातली. एवढेच नाही तर पाठीत खंजीर खुपसल्याची भावना निर्माण झाल्याने समीर देशमुख यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर शेंडे यांच्या वाटेत फुलापेक्षा कॉंटेच जास्त असल्याचे दिसून येते.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नव्या दमाच्या अतुल वांदिले यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे सुधीर कोठारी आणि राजू तिमांडे यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांना साहेबांचा कॉल आला की, त्यांचं बंड लगेच थंड होईल, अशी सगळीकडे चर्चा आहे. मात्र वर्ध्यात काँग्रेसचे बंडखोर ऐकतील अशी सध्या तरी परिस्थिती नाही.
आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी सुमित वानखेडे यांना मिळाली. त्यामुळे आमदार दादाराव केचे यांनी देखील”अभी नही तो, कभी नहीं” असा पवित्रा घेतल्याने याठिकाणी तीरंगी लढत होणार, हे जवळपास निश्चित आहे.