वर्ध्यात आयपीएलच्या जुगारावर मोठी कारवाई ; ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त ; मुख्य बुकीसह पाच जणांवर कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासह सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी काल रात्रीच्या सुमारास आयपीएलच्या जुगारावर मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन वाहनांसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहरातील मुख्य बुकीसह पाच जणांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आयपीएलच्या मुंबई विरुद्ध दिल्ली या कालच्या सामन्यावर शहरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी लागलीच भामटीपूरा परिसरातील तेलंगपूरा आखाड्या समोरच्या वडाच्या झाडाखाली ओट्यावर बसून हारजितचा जुगार खेळणाऱ्या गणेश राठी नामक बुकीस ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची पडताळणी केली असता त्यात शास्त्री चौक, पोद्दार बगीचा येथील सलमान रज्जाक मेमन (वय२७) हा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या फोन नंबरची तांत्रिक माहिती गोळा केली असता, तो बुट्टीबोरी परिसरातील टाकळघाट येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी टाकळघाट येथील लिंक बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरील दहा क्रमांकाच्या फ्लॅटवर पंचासमक्ष धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी सलमान रज्जाक मेमनसह जितेंद्र रंजित तिवारी (वय३४) रा. रामनगर, माधव ईश्वरदास नानवाणी (वय३४) रा. दयाल नगर, मुकेश अनिल मिश्रा (वय३३) रा. रामनगर व रिंकेश मनोज तिवारी (वय२७) रा. गजानन नगर, वर्धा यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लॅपटॉपसह ४० मोबाईल, पेनड्राईव्ह, मोबाईल होल्ड बॉक्स, स्टॅन्ड, माईक, लॅपटॉप मोबाईल चार्जरसह एम एच ३२ एएस ६४०० क्रमांकाची काळ्या रंगाची एक टाटा सफारी तसेच एम एच ३२ एएस ५७८६ क्रमांकाची काळ्या रंगाची ह्युंडई क्रेटा गाडी असा एकूण ४९ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात वर्धा, चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेकजण क्रिकेटच्या सामन्यांवर जुगार खेळत असून दुसऱ्यांच्या नावाखाली वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करीत असल्याने मुख्य बुकीसह पाच जणांवर भादंवि ४२०,४६८,४७१, ३४ सहकलम १२(अ), ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षकांचे क्राईम इंटेलिजन्स पथक व सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी केली.