सोने पॉलिशच्या नावाखाली भामट्यांनी घातला गंडा ; ३४ ग्रँम सोन्याचे दागिने घेऊन भामटे पसार

सचिन धानकुटे
वर्धा : – सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या नावाखाली दोन भामट्यांनी म्हतारीला गंडा घातल्याची घटना आलोडी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. यात ३४ ग्रँम सोन्याचे दागिने घेऊन भामटे पसार झाल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलोडी येथील ढवळे ले-आऊट मध्ये राहणाऱ्या भुते यांच्या घरी दुपारच्या सुमारास म्हतारी आजी एकटीच घरी होती. यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन अज्ञात भामट्यांनी शाम्पू विकण्याच्या नावाखाली त्यांच्या घरात प्रवेश केला. म्हतारीला शाम्पू घेता का असे विचारताच त्या भामट्यांची नजर म्हातारीच्या सोन्याच्या दागिन्यांवर पडली. त्यानंतर त्यांनी म्हातारी समोर दागिने पॉलिश करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. याकरिता म्हातारीने चक्क आपल्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली अडीच तोळ्याची एकदाणी, कानातील पाच ग्रँमच्या दोन बिऱ्या, तीन ग्रँमची सोन्याची अंगठी, एक ग्रँमचं डोरलं असा जवळपास ३४ ग्रँम सोन्याचा ऐवज पॉलिश करण्यासाठी दोन्ही भामट्यांच्या हवाली केला. दरम्यान पॉलिश करता-करता एकाने म्हातारीला बोलण्यात गुंतवले आणि दुसऱ्याने दागिने घेऊन तेथून पोबारा केला. यावेळी प्रसंगावधान राखत दुसरा भामटाही तेथून पसार झाला. म्हातारीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तीने यासंदर्भात आपल्या नातवास कळविले. त्यानंतर त्याने सेवाग्राम पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भामट्यां विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.