Breaking
ब्रेकिंग

महाविकास आघाडीतील गृहकलह चव्हाट्यावर, गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांची गोची..! काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

2 0 3 1 2 3

सचिन धानकुटे

सेलू : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिकडेतिकडे प्रचारतोफा धडाडत आहेत. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण व्हावी याकरिता ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहेत. मनभेद आणि मतभेद बाजूला सारत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, यासाठी प्रमुख नेते आकाशपाताळ एक करीत आहेत. दरम्यान काँग्रेसच्या सेलू शहरात आयोजित एका कार्यकर्ता मेळाव्याकडे दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने महाविकास आघाडीतील “गृहकलह” मात्र यानिमित्ताने चव्हाट्यावर आला.

         काँग्रेसमध्ये सेलूच्या राजकारणात नेहमीच दोन गट कार्यरत राहिले आहेत. यात सदानकदा एकमेकांची जिरवण्यासाठीची एकही संधी सोडली जात नाही. प्रत्येक निवडणुकीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यातून विस्तव देखील जात नसल्याचे नेहमीच दिसून आले. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच काँग्रेसच्या हातात हात नाही. आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सुटली आहे. त्यांना देखील जागा तर मिळविता आली, परंतु शेवटी उमेदवार हा काँग्रेसचाच आयात करावा लागला. नामांकन अर्ज दाखल करतेवेळी आघाडीच्या एकजुटीमुळे अनेकांना धडकी भरली होती. प्रचारात देखील सगळे काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले होते. एव्हाना मतदारसंघात चांगलीच काटे की टक्कर होणार हे जवळपास निश्चित झाले.

     दरम्यान शहरातील काँग्रेसच्या एका गटाने काल शनिवारी सेलूत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. या मेळाव्याची पोस्टरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यामध्ये एका गटाच्या नेत्याचा साधा फोटोही न टाकल्याने नेमका आघाडीत मिठाचा खडा पडला. या मेळाव्यासाठी उमेदवार देखील आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक गटाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. परंतु ह्याचवेळी दुसऱ्या गटाच्या कार्यकर्ते अन् नेत्यांनी त्या मेळाव्याकडे पाठ फिरवत विचारमंथन करण्यातच धन्यता मानली. “जिकंलो तर आमच्यामुळे आणि हरलो तर तुमच्यामुळे” असा क्रेडिटचा नवा वाद यातून उफाळून आला. वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेतली जावू शकते असेही ते यावेळी खाजगीत बोलत होते. साहजिकच महाविकास आघाडीतील गटातटाच्या राजकारणात कार्यकर्त्यांची पार गोची झाली असून पक्षांतर्गत गृहकलह मात्र यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे