शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज चौकात उद्या गडगडणार शाहिरी तोफ
किशोर कारंजेकर
वर्धा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उल्हासपूर्ण वातावरणात सोमवार 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीने रविवार 18 फेब्रुवारीला पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता प्रारंभ होणाऱ्या या कार्यक्रमात शाहिरीतोफ गडगडणार आहे.
शिवकालीन इतिहासात पोवाडा या गायन कलेला मोठे महत्त्व प्राप्त आहे. लोककला म्हणून तिला राज मान्यता मिळाली आहे. शिवरायांचा इतिहास डफावर थाप देत शाहीर खड्या आवाजात सांगतो. शाहिराच्या श्रीमुखातून बाहेर पडणारे शब्द तत्कालीन इतिहास डोळ्यासमोर उभा करते. रविवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याशेजारी आयोजित कार्यक्रमात जालना येथील अरविंद घोगरे पाटील हे प्रसिद्ध शाहीर पोवाड्यातून छत्रपती शिवरायांच्या इतिहासासोबतच छत्रपतींची अर्थनीती यावर ते प्रकाश टाकतील.
त्यांना साथसंगत करण्याकरिता कलावंताची चमू यावेळी उपस्थित राहणार आहे. खड्या आवाजात सादर होणारा पोवाडा वर्धेकरांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही. आकर्षक रोषणाई, वाद्य वृंदाचा गजर करीत सादर होणाऱ्या कार्यक्रमाला वर्धेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन दीपक चुटे, ऍड. विनय घुडे, सचिन खंडारे, रुपेश भोयर, नितीन शिंदे, विलास आष्टेकर, विनोद वानखेडे, सोहमसिंग ठाकूर, प्रवीण होणाडे, प्रदीप शिंगरू, महेश राजुरकर, नरेश पाटणकर, आकाश सोनवणे, नरेश पेटकर, राजू शिंदे, नरेंद्र केदार, ललित इंगोले, संदीप वर्मा, मिलिंद आंडे, किशोर कारंजेकर, एकनाथ चौधरी यांचेसह इतरांनी केले आहे.