अभिनव धुलिवंदनाची २७ वर्षाची अनोखी परंपरा..! सुरगांवात आजपासून राष्ट्रसंताच्या विचारांची उधळण
सचिन धानकुटे
सेलू : – नजिकच्या सुरगांव येथील रंगविरहीत धुळवडीला गेल्या २७ वर्षाची परंपरा लाभली असून यानिमित्ताने आजपासून सतत तीन दिवस राष्ट्रसंताच्या विचारांची उधळण केल्या जाणार आहे. येथील समाजप्रबोधनकार तथा सप्तखंजरीवादक प्रविण महाराज देशमुख यांच्या पुढाकारातून हा सोहळा अविरतपणे सुरू असून विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अभिनव धुळवड आणि संतविचार ज्ञानयज्ञ सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. आज शनिवारपासून तर सोमवारपर्यंत तीन दिवस पार पडणारा हा संत विचारांचा ज्ञानयज्ञ सगळ्यांसाठी पर्वणीच असतो.
या अभिनव अशा धुलिवंदन सोहळ्याचे आज शनिवार ता.२३ रोजी सायंकाळी पाच वाजता गुरुदेवप्रेमी मंडळ अधिकारी रमेश भोले, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे, अवतार मेहेरबाबा केंद्राचे एम. बी. महाकाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर सुरेशदादा मांढरे प्रबोधन करणार आहेत. हिंगणघाट येथील नारायण महाराज खाडे यांचे रात्री आठ वाजता राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित किर्तन आयोजित करण्यात आले आहे. रविवार ता.२४ रोजी पहाटे बा. दे. हांडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, नामधून पार पडणार असून त्यानंतर निशुल्क आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात विषमुक्त शेती या विषयावर आधारित शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच सामान्य ज्ञान परिक्षा, बालमेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वधर्म समन्वय संमेलन, सामुदायिक प्रार्थना व किर्तन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार ता.२५ रोजी पहाटे ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, सकाळी प्रभातफेरी व त्यानंतर संतविचार ज्ञानयज्ञाचा कार्यक्रम, यामध्ये भजन संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. रात्री समाजप्रबोधनकार तथा सप्तखंजरीवादक प्रविण महाराज देशमुख यांच्या कार्यक्रमानंतर अभिनव धुळवडीचा समारोप होईल.