बायकोवर पतीसह दिराचा प्राणघातक हल्ला ; जीवघेण्या हल्ल्यात तीघे गंभीर जखमी ; सिंदी (रेल्वे) येथील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – पत्नीसह एलकुंचवार कुटुंबातील दोन सदस्यांना दगडं तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील सिंदी(रेल्वे) येथे काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीहून सिंदी पोलीस ठाण्यात पती मनोज व दिर शरद गवते विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एलकुंचवार कुटुंबातील सदस्यांसमवेत फिर्यादी महिला एका खाजगी वाहनाने मंगळवारी कामानिमित्त सिंदी येथे आले होते. दरम्यान मुलीचे कपडे घेण्यासाठी त्यांनी गवते यांच्या घराचे कुलूप उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला. या कारणास्तव पती मनोज गवते यांनी आपल्या पत्नीस मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यामुळे सगळेजण गाडीत बसून नागपूरला जायला निघाले. दरम्यान रेल्वे गेट बंद असल्याने त्यांची गाडी थांबून होती. यावेळी त्याठिकाणी पती मनोज व दिर शरद या दोघांनी पुन्हा मोटारसायकलने जात त्यांच्या गाडीवर दगडं मारलेत व गाडीचे देखील नुकसान केले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी गाडीतून एलकुंचवार कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढून दगडं तसेच लाठ्याकाठ्यांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली. यात अर्चना एलकुंचवार यांच्या डोक्यावर दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात तर विजय यांना देखील काठी व दगडाने मारहाण करण्यात आल्याने तेही जखमी झाले. सदर मारहाणीत जखमी झालेल्यांना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी प्रिती गवते यांच्या तक्रारीहून सिंदी पोलीस ठाण्यात पती तसेच दिरा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. यातील दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.